नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं त्यांना काही दिवसांपूर्वीच समन्स बजावलं होतं. दरम्यान, राहुल गांधींची चौकशी राजकीय सुडभावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केले आहे. आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी ईडीकडून आठ तास चौकशी झाली. राहुल गांधी सकाळी ११.०५ वाजता मुख्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांची बहीण सरचिटणीस प्रियांका गांधी सोबत होत्या. ११.३० वाजता चौकशी सुरु झाली होती. चार तास चौकशीनंतर ३.३० वाजता ते घरी गेले. दुपारी ४.३० वाजता राहुल गांधी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले. रात्री ८.३० पर्यंत ते ईडीच्या कार्यालयातच होते. बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलविले होते. त्याप्रमाणे आज त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने सोमवारी राहुल गांधी यांची दहा तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा हजर होण्यास सांगितले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली होती.