नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी दुपारी काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केली. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये, यासाठी निवडीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाने घेतला होता. त्यानुसार आज हा निर्णय जाहीर करण्यात आला. राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत.
16 डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. 16 डिसेंबरला राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले जाईल. यावेळी देशभरातील काँग्रेस नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते अर्थातच राहुल गांधी यांच्या नावाचे होते असे काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले.
काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील.