कमलेश वानखेडे -
राजकोट : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवून गुजरातमध्ये दाखल होत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी व महागाईचे कार्ड खेळत युवक, मध्यमवर्गीयांसह लघुउद्योजकांना साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा थेट उल्लेख करणे टाळत जनतेच्या मनातील मुद्द्यांना हात घालण्यावर त्यांनी अधिक भर दिला.
सोमवारी सायंकाळी राहुल गांधी यांनी राजकोटच्या शास्त्री मैदानावर प्रचार सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
गुजरात लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. संपूर्ण देश तुम्ही चालविता. तुम्ही खरे रोजगार देता. पण सरकारने नोटबंदी केली. सर्व लघु व मध्यम उद्योग बंद झाले. चुकीची जीएसटी लागू केली. त्यामुळे जे वाचले होते तेही संपले. अरबपतींसाठी यांना रस्ता साफ करायचा होता. तीन-चार उद्योगपतींचे लाखो-कोटींचे कर्ज माफ होेते; पण शेतकरी एक लाखाचे कर्ज घेतो ते माफ का होत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. - राहुल गांधी
यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजकोटच्या सभेत राहुल यांनी या मुद्द्याला हात घालत ही यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख असल्याचे सांगितले. पण सोबतच भारत जोडो सुरू करण्यामागे महात्मा गांधींचा, गुजरातचा विचार आहे. - हा रस्ता गांधी, सरदार पटेल यांनी दाखविला होता, असे सांगत त्यांनी गुजरातला क्रेडिट दिले. मी दोन हजार किलोमीटर चाललो ही काही मोठी गोष्ट नाही. लॉकडाऊनमध्ये या देशातील मजूर उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालले. त्या संकटकाळात गुजरात सरकारने मदत केली नाही. उलट त्याचवेळी देशातील श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका करीत आम्हाला न्याय करणारा भारत हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसींच्या जिवात जीव आलानिवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. गुजरातची पहिल्या टप्प्यातील निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राहुल यांची एकही जाहीर सभा झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चिंतित होते. पण राजकोटच्या सभेने काँग्रेसींच्या जिवात जीव आला. राहुल गांधी यांच्या सभेने मिळालेल्या बूस्टरमुळे पुढचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.