Smriti Irani on Congress Rahul Gandhi : सध्या मणिपूरमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) प्रचारासाठी मणिपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच मणिपूरचा वापर राहुल गांधींच्या यांनी एटीएमप्रमाणे केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपूरचा वापर एटीएमप्रमाणे केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. ११ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही मणिपूरच्या शेतकऱ्या अतिरिक्त २ हजार रुपये देऊ," अशी घोषणा स्मृती इराणी यांनी केली.
जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. पूर्वेकडिल क्षेत्राकडे दुर्लक्ष आण आपलाच खिसा भरण्यासाठी एटीएमप्रमाणे वापर केल्याचा आरोप करत मणिपूरचे भाजप प्रभारी संबित पात्रा (Sambit Patra) आणि स्मृती इराणी यांनी २१ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींच्या निर्धारित रॅलीवर लोकांना बहिष्कार टाकण्यास सांगितलं.
"काँग्रेस विकास करेल का?"मणिपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या इराणी यांनी शुक्रवारी इम्फाळ पूर्वेतील वांगखेई भागात पारंपारिक काबुई नृत्य करणाऱ्या कलाकारांसोबत नृत्यही केले. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्मृती इराणी भाजपचे उमेदवार ओकराम हेनरी सिंग यांच्या प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. ओकराम हेनरी हे मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांचे पुतणे असून ते वांगखेई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. "काँग्रेस पक्षाला शौचालय बांधता आले नाही. ते भविष्यात तुमच्यासाठी काम करेल आणि विकास करेल अशी तुम्हाला आशा आहे का?," असा सवालही इराणी यांनी केला.
काँग्रेस सरकारनं मणिपूरसोबत अन्याय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरात शौचालय उभारलंय. राजकारणात शौचालय कधीच अजेंड्याचा विषय नव्हता. परंतु मोदींनी असं केलं असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधला. डॉ. मनमोहन सिंग हे आसाममधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु आपल्या कार्यकाळादरम्यान ते कधीही मणिपूरला गेले नाही, असं पात्रा म्हणाले.