राहुल गांधी चित्रपटास गेल्याचा मुद्दा: भाजपाने खासगी आयुष्यात डोकावू नये ,समाजवादी पक्षाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:39 AM2017-12-21T00:39:46+5:302017-12-21T00:40:05+5:30
हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील एका चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट पाहावयास गेले होते.
नवी दिल्ली : कोणाच्या खासगी आयुष्यात डोकवायच्या मानसिकतेतून संकुचित मनोवृत्तीच्या बाहेर पडावे असा सल्ला समाजवादी पक्षाने बुधवारी भाजपाला दिला आहे.
हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील एका चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट पाहावयास गेले होते. त्याबद्दल भाजपाने राहुलवर टीका केली होती.राहुल गांधी अर्धवेळ पक्षाध्यक्ष आहेत, असे भाजपाने म्हटले होते.
त्यावर समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल म्हणाले की भाजपा एवढा संकुचित मनोवृत्तीचा का आहे? ते कोणाच्या खासगी आयुष्याशी का संबंध जोडतात? भाजपा नेत्यांची पातळी फारच घसरली आहे. त्यांनी या प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर पडणे हे त्यांच्या गरजेचे आहे. काँग्रेसनेही भाजपाच्या टीकेचा समाचार घेतला आहे. कोणाच्या खासगी आयुष्यात भाजपाने डोकावण्याचे कारण नाही. शिवाय निवडणूक निकाल व चित्रपट पाहण्यास जाणे, याचा संबंध जोडणे गैर आहे. राहुल यांनी चित्रपटांविषयी रस असल्याबद्दल भाजपाने टीका करण्याचे कारण नाही.
स्टार वॉर्स-
राहुल गांधी पीव्हीआर चाणक्य चित्रपटगृहात ‘स्टार वॉर्स’ पाहायला गेले होते. सोमवारी गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला व त्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर गांधी यांची राजकारणाशी काही बांधिलकी नाही अशी चर्चा व टीका सुरू झाली. भाजपानेच या चर्चेला व टीकेला सुरुवात केली.