जीएसटीमुळे देशात आली टॅक्स दहशतवादाची त्सुनामी, राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 09:01 PM2017-10-26T21:01:40+5:302017-10-26T21:05:16+5:30
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे.
नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी पीएचडी चेंबर्स ऑफ काँमर्सच्या वार्षिक महोत्सवाला संबोधित करताना नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अपंग झाली आहे. सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे देशात टॅक्स दहशतवादाची त्सुनामी आली आहे. आता येत्या 8 नोव्हेंबरला 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणले,"देशातील व्यवसाय बुडत आहेत. पण जेटली देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सारे काही आलबेल असल्याचे टीव्हीसमोर येऊन सांगतात. मोदी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला केला आहे. सुरुवातील नोटाबंदी आणि नंतर जीएसटी या दोघांमुळे आमची अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. सरकारने ज्यापद्धतीने जीएसटी लागू केली आहे. त्यामुळे देशात करदहशतवाद आला आहे. तसेच यानंतर परिस्थिती अधिकच वाईट होणार आहे."
मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "व्यवसाय हा विश्वासावर चालतो. पण या सरकारवरील विश्वास उडाला आहे. पंतप्रधान आणि सरकारला प्रत्येक व्यक्ती ही चोर आहे, असे वाटते. सगळाच पैसा काळा असू शकत नाही. पंतप्रधानांनी आपल्या अधिकारांचा उपयोग मोठी छाती आणि छोट्या हृदयाने केला आहे."
"मोदी सरकारमध्ये सर्वसामान्यांची ऐकणारा कुणी नाही. विश्वास एकमेकांना विकसित करतो. सरकारने जनतेचे ऐकणे, जनतेवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. स्टार्टअप इंडियासोबत शटअप इंडिया नाही चालू शकत," असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गुरुवारी सकाळी निशाणा साधला होता. 'नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे आणि तुमच्या औषधातही काही जोर नाहीय', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. सलग तीन वर्ष भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते. यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती.
दरम्यान, पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी 9 लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. यात बुडित व थकित कर्जांखाली दबलेल्या सरकारी बँकांना भांडवलपूर्तीसाठी 2 लाख 11 हजार कोटी देण्याचा व ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेसह अन्य महामार्ग व रस्ते बांधणीसाठी तब्बल सात लाख कोटी रुपये खर्च करण्याचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या खात्याच्या वित्त, वित्तीय सेवा, महसूल या तिन्ही विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांना सोबत घेऊन, देशाची अर्थव्यवस्थेला ठराविक क्षेत्रांत थोडासा टेकू दिला, तर ती पुन्हा जलद विकासाच्या दिशेने धाव घेण्यास सक्षम आहे, असा दावा केला. दरम्यान, या घोषणांचा निवडणुकांशी काहीही घेणं-देणं नाही,असेही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले. ज्यांनी देश उद्ध्वस्त केलाय, आता ते प्रवचनच देणार असे सांगत जेटलींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.