गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी राहुल गांधींची हिंदुत्वाची खेळी, तीन दिवसांच्या दौ-यात पाच मंदिरांना भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 01:52 PM2017-09-28T13:52:45+5:302017-09-28T13:55:19+5:30
राहुल गांधी यांनी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यात पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या सौराष्ट्रचा तीन दिवसांचा वादळी दौरा करत नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नवसृजन यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाकडून काँग्रेसवर लावण्यात आलेल्या अनेक आरोपांचंही उत्तर दिलं. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्ड खेळलं.
राहुल गांधी यांनी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यात पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या.
पटेल समाजासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या कागवाड गावातील खोडलधाम येथेही ते गेले होते. येथे पटेल समाजातील लोकांनी एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. राजकोटला परतल्यानंतर राहुल गांधी जलाराम बापा मंदिरात गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, राहुल गांधी या मंदिराला भेट देण्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राहुल गांधी यांच्या यात्रेवर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ता मनीष दोषी यांनी सांगितलं की, 'भाजपा आणि आरएसएसचे लोक जाणुनबुजून काँग्रेसला हिंदू विरोधी सांगत असतात. राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट देत केलेला दौरा हा त्यांना उत्तर आहे'.
भाजपा प्रदेशाध्यक्ष जितू वघानी बोलले आहेत की, 'गरब्यात आरती कशी करायची, दर्शन कसं घ्यायचं याबाद्दल राहुल गांधींना काहीच माहिती नाही. काँग्रेस नेत्यांना त्यांची मदत करावी लागली. यावरुन काँग्रेस मतं मिळवण्यासाठी किती आतूर आहे हे दिसत आहे'. मात्र निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी दौरा करत मंदिरांना भेट देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
याआधी 2009 रोजी राहुल गांधी यांनी अम्बाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. यानंतर 2016 रोजी देखील मेहसाना येथे एका रॅलीदरम्यान राहुल गांधी दर्शनासाठी मंदिरात पोहोचले होते. याशिवाय गेल्या दौ-यात राहुल गांधी यांनी डेडियापाडा येथे एका आदिवासी मंदिराचं दर्शन घेतलं होतं.