जयशंकर गुप्त, नवी दिल्लीऐन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रजेवर गेल्याने अनेक तर्कवितर्कांना ऊत आला असून अटकळींचा बाजार गरम आहे़ लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात व पक्षाबाहेर राहुल यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़ यामुळे चिंतीत राहुल १६ फेबु्रवारीपासून देशाच्या राजकीय पटलावरून गायब आहेत़ दरम्यान, विरोधी पक्षांनी यावर बोचऱ्या शब्दात टीका केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विदेशात खासगी दौऱ्यावर आहेत़ त्यांच्याभोवती २४ तास राहणारे एसपीजी सुरक्षा कमांडोही यावेळी त्यांच्यासोबत नाहीत़ काँग्रेस सूत्रांनी मात्र ताजा राजकीय घटनाक्रम आणि पक्षाची भविष्यातील रणनीती यावरील आत्मचिंतनासाठी ते काही आठवड्यांच्या रजेवर गेले आहेत़ पक्षाध्यक्ष सोनियांकडून पूर्वपरवानगी घेऊन ते या रजेवर गेले आहे़ त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे़सूत्रांनी सांगितले की, पक्षात राहुल दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत़ मात्र एखाद्या महत्त्वाच्या मुद्यावर निर्णय घेण्याची वेळ येताच, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी राहुल यांच्यासोबतच पक्ष सरचिटणीस आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवतात़ या बैठकीत सर्वसहमतीने निर्णय होतात़ पण पराभवाचे खापर केवळ एकट्या राहुल यांच्या माथी फोडले जाते़ काही सूत्रांच्या मते, पक्षांच्या या निर्णयप्रक्रियेत बदल होणार की ती आहे तशीच सुरू राहणार, याचे उत्तर राहुल यांनी सोनियांना मागितले आहे़ काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते वाचाळ वक्तव्ये करीत असूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही, यामुळे राहुल नाराज आहेत़राहुल गांधी सध्या कुठे आहेत, याबाबत काँग्रेसकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही़ राहुल यांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे तर हे प्रयत्न नाहीत ना? असा एक सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे़ काँग्रेसने मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे़ लवकरच ते सुटीवरून परततील व कामकाजात सक्रिय होतील, असे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी स्पष्ट केले़