नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात रजेवर गेल्यामुळे सुरू असलेले तर्कवितर्क अद्याप थांबलेले नाही. ते दोन आठवड्यांच्या सुटीवर असल्याचा खुलासा काँग्रेसने अधिकृतरीत्या केला आहे.राहुल गांधी यांनी अचानक घेतलेल्या सुटीचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी सुटीची वेळ चुकीची असल्याचे टिष्ट्वट करीत वाद ओढवून घेतला आहे. आम्ही पूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे. आपापल्यापरीने वेगवेगळे अर्थ काढून तर्कवितर्कांवर भर देऊ नका किंवा संशयाची सुई वळवू नका. अशा प्रकारचे तर्कवितर्क आणि अटकळबाजीच्या प्रयत्नांना आम्ही नाकारत आहोत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी म्हटले. पत्रकारांनी प्रश्न विचारून भंडावून सोडल्यानंतर सूर्जेवाला यांनी राहुल गांधी हे दोन आठवड्यांच्या सुटीवर असल्याचे स्पष्ट केले. ते भारतात आहेत की विदेशात, या प्रश्नावर, अशा बाबींकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असे सूर्जेवाला यांनी संतप्त होत पत्रकारांना सुनावले. दिग्विजयसिंग यांना सुटीची वेळ योग्य वाटत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, मी त्यांचे निवेदन वाचलेले नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. अलीकडच्या निवडणुकीनंतर सातत्याने वाट्याला आलेले पराभव आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत सफाया झाल्याच्या पार्श्वभूमी राहुल गांधींना चिंतनासाठी शांतता हवी असेल तर त्यांच्या निर्णयाचे समर्थन करतो, फक्त वेळ योग्य हवी होती, असे दिग्विजयसिंग म्हणाले होते.
राहुल गांधींची सुटी दोन आठवड्यांची
By admin | Published: February 25, 2015 1:54 AM