नवी दिल्ली: लोकसभा सचिवालयाच्या एका परिपत्रकानं दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सचिवालयानं खासदारांसाठी उपलब्ध असलेल्या बंगल्यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सध्या रिकामी असलेल्या बंगल्यांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बंगल्याचाही समावेश असल्यानं दिल्लीत चर्चेला उधाण आलं आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असतानाही त्यांचा बंगला रिकामा दाखवण्यात आल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज लोकसभा सचिवालयानं खासदारांसाठी रिकामी असलेल्या बंगल्यांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 12 तुघलक लेनचादेखील समावेश आहे. राहुल गांधी 2004 मधून याच बंगल्यात राहतात. राहुल गांधी ज्यावेळी पहिल्यांदा अमेठीतून जिंकले, तेव्हापासून ते 12 तुघलक लेनमध्ये वास्तव्यास आहेत. हा बंगला टाईप 8 प्रकारातला असून तो सर्वात मोठादेखील आहे. सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील बंगले खासदारांना दिले जातात. या यादीत खासदार असलेल्या राहुल यांच्या बंगल्याचा समावेश असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदारांना सचिवालयाकडून देण्यात आलेल्या यादीत 517 बंगल्यांचा समावेश आहे. यातून खासदारांना बंगल्यांची निवड करायची आहे. यामध्ये राहुल यांच्या बंगल्याचा समावेश असल्यानं अनेकांना धक्का बसला. राहुल यांच्या कार्यालयाला या परिपत्रकाबद्दल कोणतीही माहिती नाही. राहुल गांधी यंदा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढले. अमेठीत भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले.
राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:31 PM