नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो. याबाबत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वाइन म्हणाले, राहुल गांधींच्या मुलाखतीच्या प्रसारणाबाबत आम्हाला तक्रार मिळाली आहे. या मुलाखतीची डीव्हीडी आम्ही मिळवली असून, या प्रकरणाची चौकशी होईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.