फेसबुकच्या वादात राहुल गांधींची उडी, ट्विट करत मोदींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 01:28 PM2018-03-22T13:28:31+5:302018-03-22T13:28:31+5:30
फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे.
नवी दिल्ली- फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे. राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, इराकमध्ये 39 भारतीयांच्या झालेल्या हत्येवरून लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकच्या डेटा लीकची गोष्ट समोर आणली गेली आहे.
इराकमध्ये 39 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. सरकारनं यातून स्वतःचा बचाव करायचा असल्यानं काँग्रेसचा फेसबुक डेटा लीक प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Problem: 39 Indians dead; Govt on the mat, caught lying.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 22, 2018
Solution: Invent story on Congress & Data Theft.
Result: Media networks bite bait; 39 Indians vanish from radar.
Problem solved.
यादरम्यान फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरीप्रकरणी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत मौन सोडलं होतं. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पावलं उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पावलं उचलली जातील. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू.