रुद्रपूर (देवरिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात पक्षासाठी प्रचाराची पार्श्वभूमी करणाऱ्या ‘किसान महायात्रा’ला प्रारंभ केला. गांधी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव, वीज दरात कपात आणि कर्जमाफीचे आश्वासनही दिले. पूर्व उत्तर प्रदेशातील या गावातून त्यांनी रोडशो करून ही २,५०० किलोमीटरची यात्रा सुरू केली. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदी आणि त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा दबाब या यात्रेतून निर्माण केला जाईल, असे गांधी म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांचा जणू विसरच पडला आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी व दु:ख हलके करण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही परंतु आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. तुमच्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही आणि कोणतेही आश्वासनही दिले नाही. शेतकऱ्यांचे संरक्षण करा कारण ते देशाला अन्नधान्य देतात, असे मी मोदीजींना सांगितले. शेतकऱ्यांचे संरक्षण तुम्ही तीन मार्गांनी करू शकतात. एक म्हणजे त्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ करणे. आमचे सरकार असताना ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते हे तुम्हाला आठवत असेलच. आता काय घडतेय तर मोदी सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले परंतु ते मोठ्या उद्योगपतींचे. (वृत्तसंस्था)
राहुल गांधींच्या महायात्रेला प्रारंभ
By admin | Published: September 07, 2016 4:38 AM