सुरेश भटेवरा, नवी दिल्ली राहुल गांधींचे नवे आक्रमक रूप पाहून सत्ताधारी भाजपच नव्हे तर संसदेतल्या छोट्या प्रादेशिक पक्षांनाही धक्का बसला आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी राहुल सध्या सोडत नाहीत. लोकसभेत त्यांनी बुधवारी सलग ४0 मिनिटे पंतप्रधान मोदी व सरकारवर हल्ला केला. ‘सूटबूट की सरकार’ नंतर ‘फेअर अँड लव्हली’ चे नवे बिरूद मोदी सरकारला चिटकवले. राहुलच्या भाषणातील आरोपांचे खंडन करण्यासाठी राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि अरूण जेटलींना उभे राहावे लागले आणि पंतप्रधानांनीही गुरूवारी आपल्या भाषणाचा सारा फोकस राहुल गांधींवरच केंद्रित केला. याबाबत काँग्रेस मुख्यालयातील एक ज्येष्ठ जाणकार म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने हा अत्यंत सुखद बदल आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्यारोप मोहिमेचा मोठा लाभ राहुलना तर होईलच, त्याचबरोबर मरगळलेल्या काँग्रेसजनांमधेही नवा जोश निर्माण होईल.> काँग्रेस उपाध्यक्षांच्या स्वभावात बदल; नव्या आक्रमक रूपामागे प्रशांत किशोर?दैनंदिन राजकीय घडामोडींमधे राहुल गांधी लक्ष घालत नाहीत, देशातील अन्य विरोधी पक्ष त्यामुळेच त्यांची पर्वा करीत नाहीत, असा आरोप सातत्याने होत होता. आता मात्र असे घडताना दिसत नाही. लोकांना भेटण्यापासून कार्यक र्त्यांची मनोगते ऐकण्यापर्यंत राहुल गांधींच्या स्वभावात बरेच परिवर्तन झाले आहे. काँग्रेसचे नवे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राहुलच्या या नव्या मेक ओव्हरमागे हात तर नाही ना, अशी कुजबुज संसदेच्या प्रांगणात ऐकायला मिळते आहे.प्रशांत किशोरनी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना आणि २0१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना मेकओव्हरसह (रुप परिवर्तन) लाँच केले होते. दोघांनाही प्रचंड यश मिळाले. काँग्रेसने प्रशांत किशोर यांच्याकडे पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशात पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी तूर्त सोपवली आहे. काँग्रेसच्या मिशन २0१९ चे काम त्यानंतर प्रशांत किशोर सुरू करतील.
राहुल गांधींच्या ‘मेक ओव्हर’ने अनेकांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2016 2:45 AM