नवी दिल्ली - मोदी आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदारराहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधींना खासदारकीही परत मिळणार आहे. मात्र, सर्वोच्च निकालाच्या ७२ तासानंतरही त्यांना खासदारकी परत देण्यात आली नसल्यावरुन शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधीना सरकार घाबरत आहे. कारण, सूरत न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध निर्णय दिल्यानंतर अवघ्या २६ तासांतच राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. त्यांना संसदेतून बेदखल करण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता याप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, राहुल गांधींची खासदारकी त्यांना परत मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता ७२ तास उलटून गेले आहेत, तरीही त्यांना खासदारकी परत का मिळाली नाही? असा सवालही शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणतात की, याबाबत आम्ही अभ्यास करुन निर्णय घेऊ, मग सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर अभ्यास केला होता का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याला सुरुवात होत आहे. या आठवड्यात मणीपूर हिंसाचार, अविश्वास प्रस्ताव आणि देशातील गंभीर विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळेच, या चर्चेत राहुल गांधींना सहभागी होता येऊ नये म्हणून राहुल गांधींना अद्यापही खासदारकी देण्यात आली नसल्याचं गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच, हे सरकार राहुल गांधींना घाबरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मानहानीचा दावा करणारे मोदी म्हणतात
राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा करणाऱ्या पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र सत्र न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलारमधील निवडणूकीच्या रॅलीमध्ये संपूर्ण मोदी जातीचा अपमान केला होता. त्यामुळे आमची लढाई या अपमानाविरोधात आहे.