नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर हॅण्डलचं नाव बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पदोन्नती मिळायच्या आधी उपाध्यक्ष राहुल गांधी आपलं ट्विटर हॅण्डल @OfficeOfRG बदलून @rahulgandhi करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्विटरवरील लोकप्रियता बघून काँग्रेसकडून 47 वर्षीय राहुल गांधी यांना राजकीय शक्ती म्हणून सादर करण्याचा विचार करतं आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांचं ट्विटर आयडी बदलण्याचा विचार सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ३ कोटी ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर राहुल गांधींचे १ कोटी ९० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. राहुल गांधींचे फॉलोअर्स मोदींच्या तुलनेत कमी असले, तरी गेल्या काही आठवड्यांपासून राहुल यांच्या ट्विट्सची मोठी चर्चा आहे. राहुल गांधी ट्विटरवर सध्या खूप अॅक्टिव्ह असून सरकारवर व्यंगात्मकपणे टीका करत असतात.
मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा मुलगा जय शहावर व्यावसायिक वादावरून निशाणा साधला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यावरही राहुल गांधी यांनी टीका केली. हवामानाचा अंदाज; निवडणुकींच्या आधी पडणार आश्वासनांचा पाऊस, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
केंब्रिज एनालिटिकाची मदत घेण्याची शक्यताकाँग्रेस केंब्रिज एनालिटिकाची मदत घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. केंब्रिज एनालिटिका या कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंब्रिज एनालिटिका ग्राहकांच्या इंटरनेट डेटाचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करते. लोकांना काय आवडतं ते त्यांच्या विश्लेषणातून समोर येतं. लोकांच्या चर्चेतील मुद्द्यांचा अभ्यास या कंपनीकडून केला जातो. याचा उपयोग राजकीय पक्षांना त्यांची रणनिती ठरविण्यासाठी होतो.