राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:27 AM2024-03-08T06:27:42+5:302024-03-08T06:28:07+5:30
पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०० जागा लढवणार आहे. एखादवेळी ३०० पेक्षाही कमी जागा लढवू शकते, असे संकेत पक्षाच्या ‘वॉर रूम’मधून मिळत आहेत.
पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षनेते राहुल गांधी यांनी रणनीती बदलली असून, अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचे धोरण आता अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रातही कमी जागांवर समाधान
- महाराष्ट्रात यावेळी अधिक जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जास्त जागा देण्याचे पक्षाने ठरवले आहे. तामिळनाडू, बिहार, केरळ व झारखंडमध्येही पक्षाने समविचारी पक्षांसोबत युती केली आहे.
- आंध्र प्रदेश व ओडिशा यांसारख्या काही राज्यांत काँग्रेसची स्थिती ठीक नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या भाजपशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांत तसेच ईशान्येत आसाम वगळता अन्य राज्यांत तुल्यबळ लढा देण्यासाठी काँग्रेससमोर अडथळ्यांची शर्यत आहे. मात्र, सत्तेत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटकात आपल्या खासदारांची संख्या वाढण्याची पक्षाला आशा आहे.
- महाराष्ट्रात काँग्रेसने २०१९ मध्ये २५ जागा लढवल्या होत्या.
- उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी १७ जागा लढविण्याचा विचार.
कुठे होणार जागा कमी?
२०१९ मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी ६७ जागा लढवल्या. मात्र, एकाच जागेवर यश मिळाले. त्यामुळे यावेळी तेथे केवळ १७ जागा लढवून विजयी जागांची संख्या किमान ५ पर्यंत नेऊ शकण्याची पक्षाला आशा आहे.
२०१९ मध्ये काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४० जागा लढवल्या होत्या. परंतु, केवळ दोनच जागा जिंकता आल्या. यावेळी पक्ष बंगालमधील केवळ त्या जागांवर उमेदवार देणार आहे जेथे विजयाची खात्री वाटते. त्याचबरोबर तेथे तृृणमूल काँग्रेससोबत जरी युती नाही झाली तरी ऐनवेळी काहीतरी तडजोड होईल, अशी पक्षाला आशा आहे.
‘आप’सोबत युती करण्यासाठी
काँग्रेसने हरयाणा, दिल्ली व गुजरातमध्ये ‘आप’ला जागा दिल्याने एप्रिलमध्ये पंजाबमध्येही दोन्ही पक्षांत जागांबाबत तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.