राहुल गांधींनी दाखवले आक्षेप टिपण; मोदी, सीतारामन, खोटे बोलल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:08 AM2019-02-14T05:08:15+5:302019-02-14T05:08:28+5:30
राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संरक्षण मंत्रालयात राफेलच्या करारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांचा आक्षेप असलेले टिपण जाहीर केले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संरक्षण मंत्रालयात राफेलच्या करारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांचा आक्षेप असलेले टिपण जाहीर केले. सदस्य कोस्ट सल्लागार एम.पी. सिंह, अर्थ व्यवस्थापक ए. आर. सुळे, अर्थ व्यवस्थापक (हवाई दल) आणि संयुक्त सचिव राजीव वर्मा यांनी १ जून २०१६ रोजी लढाऊविमानांच्या खरेदीसाठी बनवलेल्या फाईलवर आपला आक्षेप नोंदवला होता. हा आक्षेप करार करणाऱ्या टीमचे अध्यक्ष असलेले डेप्युटी चीफ आॅफ एअर स्टाफ यांना पाठवला गेला.
या अधिकाºयांनी दोन मुद्यांवर गंभीर आक्षेप घेतला होता. १) राफेल विमानांची किंमत व २) राफेलचा ताफा भारतात येण्याची मुदत. या दोन मुद्यांवर वायुसेनेला कळविले की, डसॉल्टने दिलेली किंमत युपीए सरकारने ठरवलेल्या अटींच्या तुलनेत खूप जास्त आहे. या अधिकाºयांचे म्हणणे होते की डसॉल्ट एका वर्षात फक्त ८ विमान तयार करू शकते. त्यानुसार भारतात विमाने वेळेत मिळणार नाहीत. गांधी यांनी आरोप केला की मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे संसदेत खोटे बोलले.
भ्रष्टाचार झाला तो इथेच
राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या गरजांनुसार ज्या गोष्टी विमानात जोडल्या जायला हव्या होत्या त्यासाठी यूपीए सरकारने १२६ विमानांसाठी जे पैसे निश्चित केले ते मोदी यांनी २५ विमानांसाठी मान्य केले. विमानांची संख्या कमी झाली; परंतु त्यासाठीचा पैसा कमी केला गेला नाही. भ्रष्टाचार झाला तो येथेच. कारण मोदी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी देत होते.