राहुल गांधींची पुन्हा एकदा हिंदुत्वाची खेळी, सौराष्ट्रनंतर आता मध्य गुजरातचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 01:57 PM2017-10-03T13:57:08+5:302017-10-03T13:58:27+5:30
राहुल गांधी मध्य गुजरातचा दौरा करणार असून 9 ते 11 ऑक्टोबर असा तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे.
गांधीनगर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच तीन दिवसांचा सौराष्ट दौरा पुर्ण केला. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या सौराष्ट्रचा तीन दिवसांचा वादळी दौरा करत नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्ड खेळलं. दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या दुस-या रोड-शोची तयारी सुरु केली आहे. राहुल गांधी मध्य गुजरातचा दौरा करणार असून 9 ते 11 ऑक्टोबर असा तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे.
राहुल गांधी यांनी पहिल्या दौ-यात हिंदुत्व कार्ड खेळलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यात पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या. पटेल समाजासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या कागवाड गावातील खोडलधाम येथेही ते गेले होते. येथे पटेल समाजातील लोकांनी एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. राजकोटला परतल्यानंतर राहुल गांधी जलाराम बापा मंदिरात गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, राहुल गांधी या मंदिराला भेट देण्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.
दुस-या दौ-यातही राहुल गांधी यांची मंदिर भेट सुरु राहणार आहे. राहुल गांधी यावेळी संतराम मंदिर, भथिजी महाराज मंदिर, मा काली मंदिर तसंच दाकोर मंदिराला भेट देणार आहेत. वडोदरा आणि बोदेली येथे त्यांचा रोड-शो पार पडणार आहे. राहुल गांधींच्या एकूण 18 बैठका पार पडणार आहेत. यावेळी राहुल गांधी शेतकरी, व्यापारी आणि युनिअन लिडरची भेट घेतील.
दिवाळीनंतर राहुल गांधी उत्तर गुजरातचा दौरा सुरु करणार आहेत. यावेळी अंबाजी, बेचराजी आणि उन्झासहित अन्य ठिकाणांना ते भेट देतील. 'सौराष्ट्रमधील रोड-शोला मिळालेला पाठिंबा पाहता, राहुल गांधी आता मध्य गुजरातचा दौरा करणार असून यावेळी आठ जिल्ह्यातील 500 किमी परिसर ते पिंजून काढतील. यावेळी चार महत्वाच्या जाहीर सभा होतील', अशी माहिती वरिष्ठ काँग्रेस नेत्याने दिली आहे.