नवी दिल्ली : काँग्रेसच्या स्थापनादिनी या पक्षातर्फे उद्या, शनिवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध करीत ‘राज्यघटना बचाओ-देश बचाओ' असा संदेश देत देशभरात मोर्चे काढले जाणार आहेत. या कायद्याला काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी ठाम विरोध दर्शविला आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत हक्कांवरच गदा येत असल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. दिल्लीसह देशभरात या कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले आहे. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.
यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. विविध राज्यांतील प्रदेश काँग्रेस समित्या आपापल्या कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करणार आहेत. त्यानंतर त्या राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढले जातील.यावेळी राज्यघटनेच्या उद्देशिकेचेही त्या त्या राज्यांतील भाषेमध्ये वाचन केले जाणार आहे.राहुल गांधी होणार सहभागीच्काँग्रेसतर्फे स्थापनादिनानिमित्त शनिवारी गुवाहाटी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार विरोध होत आहे. तिथे या कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण नंतर देशभरात पसरले होते. उत्तर प्रदेश, दिल्लीसह काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळणही लागले.