नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रवास करणार असलेल्या विमानात घातपात केला जाण्याची संभाव्य शक्यता समूळ निपटून करण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजी कमांडोंनी या विमानातील इंधन पूर्णपणे बदलायला लावल्याची घटना गेल्या बुधवारी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याची माहिती आता समोर आली आहे.१४ सप्टेंबर रोजी वाराणसीला जाण्यासाठी राहुल गांधी इतर प्रवाशांसोबत सकाळी ८.५५ वाजता सुटणाऱ्या इंडिगोच्या विमानात येऊन बसले. व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या सुरक्षा मॅन्युअलमध्ये विमानाने प्रवास करत असताना त्या विमानाचे इंधन, घातपाताची दूरान्वयानेही शक्यता राहू नये यासाठी, तपासून पाहण्याचे बंधन आहे. त्यानुसार राहुल गांधीच्या एसपीजी कमांडोंनी इंडिगोच्या या विमानातील इंधनाची तपासणी (अॅक्वा टेस्ट) केली. एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा केलेल्या तपासणीत विमानातील इंधनात प्रमाणाबाहेर भेसळ असल्याचे दिसून आले, असे सूत्रांनी सांगितले.अशा भेसळयुक्त इंधनाने विमानोड्डाण करणे धोक्याचे वाटल्याने एसपीजी कमांडोंनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना विमानातील इंधन पूर्णपणे काढून नवे चांगले इंधन भरण्यास लावले. इंधनाचे हे पुनर्भरण होण्यात सुमारे ५० मिनिटे गेली व अखेरीस तासाभराच्या विलंबाने विमानाने वाराणसीकडे प्रस्थान केल, असेही सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी यांच्याशी निकटवर्ती सूत्रांनी या घटनेस दुजोरा देताना सांगितले की, सुरुवातीच्या प्रवाशांसोबतच राहुल गांधी विमानात जाऊन बसल्यावर त्यांच्या एसपीजी कमांडोंनी त्यांचे सुरक्षा तपासणीचे काम नियमानुसार सुरु केले. हे काम सुरु असल्याने विमानास ३० मिनिटांचा विलंब होईल, असे वैमानिकाने सुरुवातीस जाहीर केले. नंतर वैमानिकाने तांत्रिक कारण देत तासाभराचा विलंब जाहीर केला.‘या बाबतीत आम्ही कोणताही तपशील देऊ शकत नाही,’ असे सांगून इंडिगोच्या प्रवक्त्याने मात्र अधिक बोलण्यास नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>इंधनाची तपासणी आधी करासूत्रांनुसार या घटनेनंतर राहुल गांधी यांनी एसपीजीच्या संचालकांकडे हा विषय उपस्थित केला व व्हीव्हीआयपीच्या प्रवासामुळे इतर प्रवाशांना होणारा विलंब टळावा यासाठी विमानाच्या इंधनाची तपासणी पुरेसा वेळ राखून आधीच करण्यात यावी, असे त्यांना सुचविले. >तपासणी सक्तीचीचराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा ज्यांना एसपीजीची सुरक्षा आहे अशी कोणतीही व्हीव्हीआयपी व्यक्ती सैन्यदलांच्या, खासगी चार्टर किंवा नियमित व्यापारी विमानाने प्रवास करणार असते तेव्हा त्या विमानातील इंधन शुद्ध आहे की नाही याची खात्री करणे हे सुरक्षा मॅन्युअलनुसार सक्तीचे असते.
राहुल गांधींच्या विमानात घातपाताचा संशय
By admin | Published: September 19, 2016 3:37 AM