नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी वैमानिकानं परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर अवघ्या काही सेकंदात राहुल गांधींचंविमान कोसळलं असतं, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयाच्या (डीजीसीए) अहवालातून समोर आली आहे. त्यावेळी राहुल गांधींच्या विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं होतं. त्यावेळी वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं, तर मोठा अनर्थ घडला असता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता होती. मात्र वैमानिकानं प्रयत्नांची शर्थ करुन परिस्थिती हाताळली. अन्यथा पुढच्या काही सेकंदांमध्ये राहुल यांचं विमान कोसळलं असतं, असं डीजीसीएनं अहवालात म्हटलं आहे. राहुल गांधी कर्नाटकमध्ये प्रचारासाठी जात असताना अचानक त्यांचं विमान एका बाजूला झुकलं. त्यातून आवाज येऊ लागला आणि विमान ऑटो पायलट मोडवर गेलं. राहुल गांधींच्या विमानात झालेला बिघाड ही तांत्रिक समस्या नसून तो मोठा कट असल्याची टीका त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली होती. राहुल यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडेही केली होती. यानंतर हवाई उड्डाण क्षेत्रातील नियंत्रक संस्था असलेल्या नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल डीजीसीएला दिला. 'कदाचित वैमानिकाच्या चुकीमुळे तसं घडलं असेल. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते एका बाजूला झुकलं आणि जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यामुळे विमानातून आवाज येऊ लागला. या प्रकरणात डीजीसीएकडून विमानातील डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट सिस्टिमची तपासणी करण्यात आली,' अशी माहिती डीजीसीएच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:10 AM