गुजरातमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली तरी राजकीय पक्षांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. आपने गेल्याच महिन्यात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली असताना आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.
गुजरातमध्ये जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. गुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर दिला जाईल, तसेच ३०० युनिटपर्यंत लोकांना मोफत वीज दिली जाईल, असेही आश्वासन राहुल यांनी दिले आहे.
अहमदाबादमधील 'परिवर्तन संकल्प रॅली'ला संबोधित करताना राहुल गांधींनी ही आश्वासने दिली आहेत. यामध्ये 10 लाख नवीन नोकऱ्या देणे, 3,000 इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निर्मिती, मुलींसाठी मोफत शिक्षण आदी आश्वासने देखील आहेत. गुजरातचे भाजप सरकार बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करेल, पण त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन दिले. सध्या 1000 रुपयांना विकला जाणारा गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ, असेही ते म्हणाले.
गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे, येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे आश्वासनही दिले. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, असे ते म्हणाले. यासोबतच तरुणांना 3000 रुपये बेरोजगारी भत्ताही दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.