ते जिथे जातात तिथे आपल्या पक्षाला पराभवाच्या खाईत लोटतात. त्यांचं एखाद्या ठिकाणी प्रचाराला जाणं म्हणजे विरोधी पक्षांसाठी मतांची बेगमी. भाजपचे नेते तर त्यांना भाजपाच्या मतांचे एटीएम कार्ड असे विशेषण वापरतात. मी कोणाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. काँग्रेससारखा दीर्घकाळ सत्तेवर असलेला पक्ष, अनुभवी नेत्यांची फौज आणि कुटुंबाच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे संचित अशी ठेव पाठीशी असतानाही राहुल गांधी यांना गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सातत्याने पराभव पत्करावे लागले. त्यातून विरोधकांनी राहुल गांधी यांची पप्पू अशी प्रतिमाही रंगवली. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी ही प्रतिमा पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारातील राहुल गांधींचा आक्रमक अवतार पाहिल्यावर ते आपली प्रतिमा बदलण्यात पुरेपूर यशस्वी ठरलेत, असे वाटत होते. राहुल गांधींबाबत बदलत असलेल्या जनमानसातील प्रतिमेची संधी साधत त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदीही निवड केली गेली. मात्र आता गुजरात निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या विजयाचे भाकीत करण्यात आल्यानंतर राहुल गांधीच्या अध्यक्षीय कारकिर्दीची सुरुवातही पराभवाने होणार की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.सध्या काँग्रेस पक्ष इतिहासातील आपल्या सर्वात वाईट काळातून जात आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी काँग्रेसची धुरा सांभाळली आहे. समोर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे सर्वस्व पणाला लावून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करणारे नेते असल्याने काँग्रेससमोरील आव्हान अधिकच कठीण आहे. अशावेळी राहुल गांधींनी गुजरातमध्ये काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचे आव्हान स्वीकारले हे खरंतर कौतुकास्पद होते. अन्य राज्यांचा विचार केला तर संघटनात्मक पातळीवर काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पक्षाला राज्य स्तरावर नेतृत्व नाही आणि आहे त्याच्या मागे जनाधार नाही, अशी परिस्थिती. त्यातच गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंग्यांवरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे गुजराती मतदारांमध्ये या पक्षाबाबत अढी होती. या सर्वांवर मात करण्यासाठी राहुल गांधींनी थेट सौम्य हिंदुत्वाचे जानवे गळ्यात घालून देवदर्शनाचा धडाका लावला. पटेल आरक्षण, दलीत अत्याचार, नोटाबंदी, जीएसटी अशा मुद्द्यांवरून भाजपा आणि मोदींवर नाराज असलेल्या घटकांना एकत्र आणून त्यांच्या असंतोषाची एकजूट करण्याचे काम केले. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर यांनी उभ्या केलेल्या आंदोलनांचे रूपांतर राजकीय असंतोषात करण्यातही राहुल गांधी यशस्वी झाले. विकास पागल हो गया या घोषवाक्याने भाजपाच्या गुजरातमधील विकासाची पोलखोल सुरू केली होती. त्यामुळेच की काय गुजरातमधील विजय गृहित धरणाऱ्या भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांचे टेंन्शन वाढले होते. अशा प्रकारे वातावरण निर्मिती झाल्याने काँग्रेसला आपण गुजरातमध्ये भाजपाला नमवू शकतो. असा विश्वास वाटू लागला. कमालीचे आक्रमक झालेल्या राहुल गांधींकडून विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांना प्रत्युत्तर देताना मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भंबेरी उडत होती. मात्र सगळे काही सुरळीत चालू असताना सोमनाथ मंदिरातील भेटीनंतर राहुल गांधींच्या हिंदुत्वाचा मुद्दा समोर आला. इथुनच प्रचाराची कूस विकासावरून धर्म आणि भावनिक मुद्यांवर वळली. पुढे मणिशंकर अय्यर यांच्या नीच वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी सुव्यवस्थितपणे मांडलेला डाव फिस्कटला. एकीकडे राहुल गांधींचा प्रचार प्रभावी असला, त्यांना हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर, छोटुभाई वासावा यांची साथ मिळाली असली तरी जनतेमधील असंतोष मतदारांना इव्हीएमपर्यंत आणून काँग्रेसच्या बाजूने आणतील, असे कार्यकर्ते काँग्रेसकडे नव्हते. दुसरीकडे भाजपाने पन्नाप्रमुखसारखे कार्यकर्ते तयार करून आपले मतदार सुरक्षित राहतील याची काळजी घेतली होती. आता कदाचित गुजरातमधील निकाल काँग्रेसच्या विरोधात जाईल, पण, असे असले तरी राहुल गांधींनी गुजरात एक कणखर आणि संयमी नेता म्हणून आपली प्रतिमा नक्कीच निर्माण केली आहे. निवडणुकीत हार जीत तर होतच राहील. मात्र या निवडणुकीने आपण मोदींना टक्कर देऊ शकतो हा दिलेला आत्मविश्वास राहुल गांधी आणि काँग्रेसला भविष्यात फायदेशीर ठरेल.
...तर राहुल गांधींच्या अध्यक्षीय कारकिर्दीची सुरुवात पराभवाने?
By balkrishna.parab | Published: December 14, 2017 10:01 PM