Rahul Gandhi's Serious Allegation: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अनेकदा सत्ताधाऱ्यांवर संसदेत बोलू देत नसल्याचा आरोप करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच आरोप केला आहे. जेव्हा-जेव्हा मी लोकसभेत बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा मला बोलू दिले जात नाही. मी बोलण्यासाठी उभे राहिलो असता, ते बोलण्यापूर्वीच कामकाज तहकूब करतात, असा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले राहुल गांधी?विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची परवानगी असते. पण, जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा मला परवानगी दिली जात नाही. सभागृह कसे चालते, हे मला माहित नाही. आम्हाला जे हवे आहे, ते बोलण्याची परवानगी दिली जात नाही. मी काहीही केले नाही, मी शांत बसलो होतो. गेल्या 7-8 दिवसांपासून मला बोलण्याची परवानगी नाही. विरोधी पक्षासाठी जागा नाही... फक्त सरकारसाठी जागा आहे. पंतप्रधान कुंभमेळ्याबद्दल बोलले, मलाही बोलायचे होते, पण त्यांना परवानगी नव्हती. सभागृह पूर्णपणे गैर-लोकशाही पद्धतीने चालवले जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
नेमके काय झाले?लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सभागृहाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला होता. बिर्ला म्हणाले की, तुम्ही सर्वांनी सभागृहाचा दर्जा आणि शालीनता राखणे अपेक्षित आहे. सभागृहात अशा अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत, सदस्य आणि त्यांचे आचरण सभागृहाच्या उच्च परंपरेला अनुसरून नाही. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा पाळा. यावर राहुल गांधी यांना काही बोलायचे होते, मात्र सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर राहुल गांधी बाहेर आले आणि सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला.