नवी दिल्ली : कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे वक्तव्य केले होते, त्याआधारे त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे दिल्ली पोलिसांनी येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर स्पष्ट केले.राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका स्थानिक न्यायालयात दाखल झाली होती. त्या नंतर २६ एप्रिल रोजी न्यायालयाने पोलिसांना कृती अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. अॅड जोगिंदर तुली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोदी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल १२४ ए कलमाखाली देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत,अशी मागणी केली होती. मोदी सैनिकांच्या रक्तामागे लपत असून त्यांच्या बलिदानाची दलाली करत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचे अॅड. तुली यांनी याचिकेत म्हटले होते.अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर बुधवारी कृती अहवाल सादर करण्यात आला. त्यात पोलिसांनी म्हटले आहे की, तक्रारीच्या स्वरूपानुसार कोणताही गुन्हा झालेला नाही. पुन्हा २२ मे रोजी सुनावणी होणार आहे.
राहुल गांधींचे वक्तव्य दखलपात्र गुन्हा नाही, पोलिसांचा कोर्टात निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:24 IST