राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून वाद; गडकरी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 06:21 PM2019-12-13T18:21:03+5:302019-12-13T18:21:25+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. लोकसभेतही भाजपानं राहुल गांधींना या विधानावरून घेरलं असून, राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बलात्कारासारख्या गंभीर विषयात राजकारण करण्याची गरज नाही. राहुल गांधींना कधी काय बोलायचं हे अजूनही समजत नाही. त्यांना बोलायची शिस्त नाही, असंही म्हणत नितीन गडकरींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं. सीएनएन न्यूज18शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गडकरी म्हणाले, राहुल गांधींना बोलण्याची शिस्त नसून, त्यांना अजून बरंच काही शिकायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी मेक इन इंडियासारखे कार्यक्रम राबवले आहे, त्याची तुलना बलात्कारासारख्या आरोपाशी करून त्या कार्यक्रमाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या राज्यात आणि सध्याच्या काँग्रेसशासित राज्यात बलात्कार होत नाही आहेत काय?, असा प्रश्नही गडकरींनी उपस्थित केला आहे.
दरम्यान भाजपाचे चंपारण्यमधील भाजपा खासदार संजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 2000 वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होतं की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. लोकसभेत स्मृती इराणी आणि इतर भाजपा खासदारांनी राहुल गांधींच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला होता. राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?, असं जयस्वाल म्हणाले होते. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. असं विधान करणाऱ्या नेत्याला संसदेचा सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.