राहुल गांधींच्या 'आरएसएस महिला शॉर्ट्स' वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत ? गुजरात निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 11:11 AM2017-10-13T11:11:26+5:302017-10-13T11:13:25+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का ? असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा वापर करत भाजपा महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करु शकतं. भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजपाने राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात कोणती रणनीती आखली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधींच्या हाफ पँटच्या वक्तव्यामुळे काँग्रेस चिंतित आहे. आरएसएसने राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचं वक्तव्य निराधार असल्याचं सांगत आरएसएसने आपली बाजू मांडली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार सत्यजीत गायकवाड यांनीदेखील राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे पक्षात थोडा अस्वस्थपणा असल्याचं कबूल केलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'आरएसएसमध्ये महिलांना सहभागी केलं जात नाही हे सर्वांनाच माहित आहे. आरएसएसचे प्रचारक खासकरुन अविवाहित पुरुषच असतात, जे संघाच्या प्रचाराचं काम करत असतात'.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे. राष्ट्रसेविका समितीची संघाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून संघाबाबत राहुल गांधींचे अज्ञान दिसून आले आहे, या शब्दांत प्रमुख संचालिका शांताक्का यांनी टीका केली.
गेल्या ८१ वर्षांपासून राष्ट्रसेविका समिती देशात कार्यरत आहे. स्वातंत्र्याअगोदरपासून सक्रिय असलेली ही देशातील एकमेव अखिल भारतीय महिला संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समकक्षच दर्जा देण्यात येतो व आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणेतूनच मावशी केळकर यांनी समितीची स्थापना केली. संघ आणि राष्ट्र सेविका समिती हे बहीण-भावाप्रमाणे आहेत. संघाच्या दरवर्षी मार्च महिन्यात होणाºया अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्र सेविका समितीचा सहभाग असतो. तसेच परिवारातील विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधीदेखील संघाच्या निर्णय प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावतात. विशेष म्हणजे याला प्रसार माध्यमांकडूनदेखील प्रसिद्धी मिळते. अशास्थितीत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य अपेक्षित नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.