ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सूचना स्वीकारत अंध विद्यार्थ्यांच्या ब्रेल पेपरवरील कर माफ केला. राहुल गांधींनी व्यापार मंत्रालयाला पत्र पाठवून ब्रेल पेपरवरील आयात कर रद्द करण्याची विनंती केली होती.
अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ब्रेल पेपरचा वापर होतो. ब्रेल पेपरवरील आयात कर रद्द व्हावा यासाठी बंगळूरुमधील माऊंट कार्मेल कॉलेजच्या एका विद्यार्थीनीने राहुल गांधी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल यांनी व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून आयात कर रद्द करण्याची विनंती केली होती.
राहुल गांधींच्या बंगळुरु भेटी दरम्यान चंदना चंद्रशेखर या विद्यार्थीनीने राहुल गांधींची भेट घेऊन ब्रेल पेपरवरील आयात शुल्कामुळे अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणा-या परिणामांची माहिती दिली होती.