नाणारवासीयांच्या संघर्षाला राहुल गांधींचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:37 AM2018-04-29T05:37:47+5:302018-04-29T05:37:47+5:30
नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शनिवारी पाठिंबा व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त करत प्रकल्पाकरिता सुपीक व चांगले उत्पन्न देणाºया जमिनी का घेतल्या जात आहेत?, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना अवगत केले. सायंकाळी अर्धा तास झालेल्या बैठकीत गांधी यांनी प्रकल्पाला होणाºया विरोधाची आणि कारणांची माहिती घेतली.
प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी संबंधित गावांत आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भाग येतो, असे सांगितले.
प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार असून मच्छीमारांसह बागायतदारांचे नुकसान होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
शिवसेना व भाजपा आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी तत्काळ अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यानुसार खा. अशोक चव्हाण २ मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली येथे शनिवारी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना नाणार प्रकल्पाविरोधातील संघर्षाबद्दल कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व सदस्यांनी माहिती दिली. सोबत डावीकडून खा. अशोक चव्हाण, आ. भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.