राहुल गांधींनी घेतली अलवर येथील बलात्कार पीडितेची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:45 PM2019-05-16T12:45:03+5:302019-05-16T12:45:53+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट अलवर येथे जात बलात्कार पीडितेची भेट घेतली.
जयपूर - राजस्थानमधील अलवर येथे एका महिलेवर तिच्या पतीसमोरच झालेल्या बलात्कार प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. एकीकडे अलवर येथील बलात्कार प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. तर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट अलवर येथे जात बलात्कार पीडितेची भेट घेतली आहे. तसेच दोषींवर कारवाई करून पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये आपला पक्ष भाजपाप्रमाणे राजकारण करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
अलवर येथील बलात्कार पीडितेची भेट घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, ''हा माझ्यासाठी राजकारण करण्यासाठीचा विषय नाही. तर भावनिक विषय आहे. मी येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, तर पीडितेची भेट घेण्यासाठी आलो आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पीडितेला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत न्याय होईल. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल.''
Congress President Rahul Gandhi: Soon after I heard about the incident (Alwar gang rape) I spoke to Ashok Gehlot Ji. This is not a political issue for me. I met the victim's family and they have sought justice which will be done. Action will be taken against culprits. #Rajasthanpic.twitter.com/rjJVoVgmtQ
— ANI (@ANI) May 16, 2019
दरम्यान, राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर पीडितेने सांगितले की, राहुल गांधी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमची भेट घेतली. आमचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले.''
राहुल गांधी हे बुधवारी अलवरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. अखेर राहुल गांधी यांनी आज पीडितेची भेट घेतली. 26 एप्रिल रोजी दुचाकीवरून जात असताना या दलित दाम्पत्याला अडवून पतीसमोरच महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर यातील एका आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.