गांधीनगर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी उत्तर गुजरातमधील प्रचाराची सुरुवात प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरापासून केली. अक्षरधाम मंदिर हे स्वामी नारायण संप्रदायाचे असून, पटेल समुदायात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस या समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.राहुल गांधी यांच्या मंदिरात जाण्याच्या कृतीस भाजपाने मतांचे राजकारण म्हटले आहे, तर देवभक्तीचा अधिकार कोणा एका व्यक्ती वा पक्षाकडे नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहेत. राहुल गांधी शनिवारी सकाळी येथे दाखल झाले आणि अक्षरधाम मंदिरात गेले. त्यांनी मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची पूजा केली आणि आपल्या तीन दिवसीय दौ-याचा प्रारंभ केला.या दौ-यात ते सहा जिल्ह्यांत जाणार आहेत. आज त्यांनी उत्तर गुजरात भागात रोड शो केला आणि काही सभाही घेतल्या. काँग्रेस व जनतेच्या दबावामुळेच मोदी सरकारला जीएसटी कर कमी करावा लागला, असा दावा त्यांनी सभांत केला.काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर देशभर एक वस्तू एक कर पद्धत लागू केली जाईल, सध्या पाच करांचा जो प्रकार आहे, त्यामुळे जनता भरडली जात आहे, असेही ते म्हणाले.भाजपाने यावर टीका करताना म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी राहुल गांधी मतांच्या राजकारणासाठी हिंदू मंदिरांत जात आहेत.उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले की, राहुल गांधी हे निवडणुकीपूर्वी मंदिरांची यात्रा करत आहेत. अशा क्लृप्त्यांतून ते मते मिळवू पाहत आहेत. त्यांचा कल देवभक्तीकडे नाही. यापूर्वीच्या दौºयात राहुल गांधी कधी कोणत्या मंदिरात गेले नाहीत. काँग्रेसने आपली ढोंगी धर्मनिरपेक्षता सोडून द्यावी आणि मुख्य प्रवाह असलेल्या हिंदुत्वाचा सन्मान करावा. पण, मते मिळविण्यासाठीचे हे प्रकार गुजरातेत यशस्वी होणार नाहीत.पेटेंट आहे काय?काँग्रेसने पलटवार करताना म्हटले की, लोक भाजपाला धडा शिकवतील. कारण, ते मंदिरात जाण्याला विरोध करत आहेत. काँग्रेसचे नेते शक्तिसिंह गोहिल म्हणाले की, विशिष्ट कुणाकडेच देवभक्तीचे पेटेंट आहे की काय?जे लोक मंदिरातील भेटीला विरोध करतात, त्यांना गुजरातची जनता धडा शिकवेल. राहुल गांधी हे हिंदू मंदिराशिवाय जैन मंदिर आणि गुरुद्वारातही गेले होते. आम्ही धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतो. राहुल गांधी सायंकाळी बनासकांठा जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबाजी मंदिरातही गेले होते.‘थँक्यू गुजरात’मोदी सरकारने १७८ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘थँक्यू गुजरात’ या शब्दांत केंद्र सरकारला टोला लगावला आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, जीएसटीमुळे त्रस्त व्यापारांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींचा गुजरात दौरा अक्षरधाम मंदिरापासून; भाजपावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 5:20 AM