नवी दिल्ली / कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील ‘१० जनपथ’ निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला दीडपट हमीभाव यासाठी यापुढे एकत्र काम करण्याचा निर्णय या चर्चेत झाला. या भेटीमुळे शेट्टी यांची काँग्रेससोबत आघाडी होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुकुल वासनिक यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीवेळी हे दोन्ही नेतेही उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर दौºयावर आलेल्या चव्हाण यांनी शिरोळला शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातही कर्जमुक्ती व उत्पादनास दीडपट हमीभाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. भाजपा सरकारकडून शेतकºयांची फसवणूक झाली आहे. शेतकºयांना काही दिलासा द्यायचा असेल तर २००७प्रमाणे पुन्हा कर्जमाफी व कृषी उत्पादनास खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला पाहिजे. त्याशिवाय प्रक्रिया उद्योगाची उभारणी, बाजार व्यवस्था आणि पुरेशी भांडवल गुंतवणूक अशा उपाययोजना केल्याशिवाय आत्महत्या कमी होणार नाहीत, असे शेट्टी यांनी सुचविले. त्यास राहुल गांधी यांनीही सहमती दर्शवली. काँग्रेसही त्याच दृष्टीने गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.स्वाभिमानी काँग्रेससोबतआघाडी करणार...या भेटीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेससोबत आघाडी करणार, हे स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपाने शेट्टी यांच्यासाठी सोडला होता. आता तो त्यांच्यासाठी काँग्रेसकडून सोडला जाऊ शकतो. शेट्टी यांच्याविरोधात भाजपाकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत.या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नाही; परंतु राहुल गांधी यांनी तुमच्यासोबत काम करण्यास आवडेल, असे सांगितले. आमचा पक्ष छोटा असला तरी हा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीत चर्चा करून घेतला जाईल.- राजू शेट्टी, खासदारव अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
राजू शेट्टी आघाडीच्या वाटेवर, राहुल गांधी यांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:28 PM