नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, अग्निवीर योजना ही लष्कराची योजना नाही, असे भारत जोडो यात्रेदरम्यान लष्करी अधिकारी आणि माजी सैनिकांनी त्यांना सांगितले होते.
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आम्ही तरुणांना त्यांच्या नोकऱ्यांबद्दल विचारले तेव्हा अनेकांनी सांगितले की ते बेरोजगार आहेत किंवा कॅब चालवतात. पीएम विमा योजनेंतर्गत पैसे न मिळाल्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या. आदिवासींनाही त्यांचा हक्क मिळाला नाही. अग्निवीर योजनेबद्दलही लोक बोलले. तरुणांनी सांगितले की, या योजनेमुळे फक्त 4 वर्षात नोकरी सोडावी लागणार आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, अनेक सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना आरएसएस, गृह मंत्रालयाकडून आली आहे, लष्कराकडून नाही. अग्निवीर योजना लष्करावर लादली जात आहे. लोकांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि नंतर त्यांना समाजात परत जाण्यास सांगितले जात आहे, यामुळे हिंसाचाराला उत्तेजन मिळेल. अग्निवीर योजना लष्कराकडून आली नाही आणि एनएसए अजित डोवाल यांनी ही योजना लष्करावर लादली, असे त्यांना (निवृत्त अधिकाऱ्यांना) वाटते, असेही राहुल म्हणाले.