नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.
उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत. आज वायनाड मतदार संघातून राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावरुन भाजपाच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पत्रकाराकांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष केले. त्या म्हणाला, "गेल्या 15 वर्षांपासून अमेठीचे खासदार अशी एक व्यक्ती आहे, ती याठिकाणी येत नाही. आता ते दुसऱ्या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीतील लोकांचा अपमान आहे. तसेच, त्यांनी देशाला का लुटले याचे उत्तर दिले पाहिजे. वायनाडमधील लोकांनी एकदा तरी अमेठीत येऊन पाहिले पाहिजे आणि सावध झाले पाहिजे. यासाठी मी त्यांना आवाहन करते."
दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून लढविली होती. मात्र, त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
(राहुल गांधींचे मिशन साऊथ; वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार, प्रियंकासोबत भव्य रोड शो )