अमेठी, दि. 8 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतल्या मतदारसंघात ते हरवल्याचे पोस्टर्स जागोजागी लागल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालीय. या पोस्टर्समध्ये राहुल गांधींना शोधणा-यास बक्षीस देणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे यातील काही पोस्टर्स हे अमेठीतल्या काँग्रेसच्या कार्यालयांसमोर झळकावण्यात आलेत.अमेठी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी राहुल गांधी मतदारसंघात आले होते. मात्र त्यानंतर ते स्वतःच्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, अशी अमेठीतल्या नागरिकांची तक्रार आहे. खासदार निधीतून कोणतीही विकासकामे होत नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोस्टरमधून नागरिकांनी आपली व्यथा मांडलीय.‘अमेठीचे माननीय खासदार श्री राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे खासदारांच्या निधीतून होणारी विकासकामं त्यांच्या कार्यकाळात बंद आहेत. राहुल गांधींच्या या व्यवहारामुळे सामान्य नागरिकांच्या मनात फसवणुकीची भावना आहे. अमेठीला राहुल गांधींची माहिती देणा-या व्यक्तीचा योग्य बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे, असे या पोस्टरवर लिहिले आहे. पोस्टरच्या खालच्या बाजूला अमेठी जनतेनं हे निवेदन दिल्याचं म्हटलं आहे.राहुल गांधींच्या पोस्टरप्रकरणी आता काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पोस्टर लावत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना सतत अमेठीत येणे शक्य नाही, असं म्हणत योगेंद्र मिश्रा यांनी राहुल गांधींची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी बेपत्ता, शोधून देणा-यास मिळणार बक्षीस !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 5:59 PM