राष्ट्रवादी अपात्रतेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, नार्वेकरांना दिला १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 08:36 AM2024-01-30T08:36:58+5:302024-01-30T08:37:31+5:30
Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे.
घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अध्यक्ष नार्वेकर यांनी ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ३० ऑक्टोबरला दिले होते. पण ही मुदत संपायला दोन दिवस उरले असताना नार्वेकर यांच्या वतीने २१ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा अर्ज सोमवारी सादर केला. याबाबत नार्वेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी याचिका शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीप्रकरणी निकाल देण्यासाठी ३१ जानेवारीच्या मुदतीचे पालन करण्याबाबत नार्वेकर यांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी ३ आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर शरद पवार गटाने वकील अभिषेक सिंघवी यांनी आक्षेप घेतला.
निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतीक्षा
- शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देताना अध्यक्ष नार्वेकर यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालाचा आधार घेण्याची संधी मिळाली होती.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवर पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगाने अद्याप निकाल दिलेला नाही. आयोगाने याप्रकरणी ८ डिसेंबरला निकाल राखून ठेवला आहे.