ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - उत्तर प्रदेशमधली काँग्रेसची परिस्थिती बिकट असून ती सुधारायची असेल तर राहूल किंवा प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे असे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचं मत असल्याचं वृत्त आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार येत्या दोन आठवड्यात उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड उलाढाली होणार असून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषित करण्यात येणार आहे. किशोर यांच्या प्रस्तावाप्रमाणे राहूल अथवा प्रियांका यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिला तर अन्य उमेदवार ब्राह्मण असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशमध्ये नाजूक आहे. पक्षामध्ये मोठे फेरफार करण्यात येणार असून 19 मे नंतर ते जाहीर करण्यात येतील असे समजते. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरी यांचा निकाल 19 मे रोजी जाहीर होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला पुन्हा महत्त्वाचं स्थान मिळावं यासाठी दोरणात्मक आखणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि असे समजते की, किशोर यांच्या मतानुसार पक्षाची धुरा ब्राह्मण व्यक्तिकडे देण्याची गरज आहे.
नरेंद्र मोदींची 2014 ची लोकसभा निवडणूक आणि नितिश कुमार यांची बिहार निवडणूक यशस्वीरीत्या हाताळलेल्या किशोर यांच्याकडे काँग्रेस धोरण निश्चित करण्यासाठी आशेने बघत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या 10 ते 12 टक्के असून हा समाज भाजपाकडे वळला आहे, आणि त्याला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करावा अशी किशोर यांची व्यूहरचना दिसत आहे. चांगल्या पर्सनॅलिटिजना समोर आणण्याचा किशोर यांचा प्रयत्न असून गेल्या काही वर्षांमधले काँग्रेसचे लोकप्रिय नेते आणि जुने राजकारणी, मंत्री कदाचित पुढेआणले जातील आणि त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात येईल अशी शक्यता आहे.
मुलायम सिंग यादव आणि मायावती या नेत्यांचा करीश्मा उत्तर प्रदेशमध्ये असून त्यांच्या मतदारांचा आधार जवळपास निश्चित आहे, जो भेदणे काँग्रेसला कठीण आहे. तर जवळपास तीन दशके उत्तर प्रदेशमधल्या सत्ताकेंद्रापासून बाहेर फेकले गेलेल्या काँग्रेसला हक्काचा मतदार नाही, ही मोठ समस्या आज पक्षापुढे आहे.