विरोधी रणनीतीसाठी राहुल-पवारांची चर्चा, प्रादेशिक पक्षांना जवळ आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:35 AM2018-03-16T06:35:57+5:302018-03-16T06:35:57+5:30
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांनी दणका दिल्यानंतर भाजपाविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोहीम उघडली असून, त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
- शीलेश शर्मा ।
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मतदारांनी दणका दिल्यानंतर भाजपाविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोहीम उघडली असून, त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील आघाडी मजबूत करण्यासाठी पवारांवर यूपीए (तीन)चे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्याचा विचार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीसाठी प्रयत्न सुरू असून, ही भेट त्यासाठीच होती, असे कळते. भाजपाचा गोरखपूर व फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांच्या एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
उत्तर प्रदेश व बिहारमध्ये काँग्रेस पक्ष काही प्रभाव दाखवू शकला नाही. तेथे प्रादेशिक पक्षांनीच भाजपाला पराभूत केले. त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांना या आघाडीत घेणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवार त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाविरुद्ध विरोधकांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याबाबत विचारविमर्श झाला.
>महाराष्ट्रातील राजकारणाचाही उल्लेख
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाचा पाठिंबा काढून घेतल्यास काय स्थिती निर्माण होईल? त्यानंतर होणाºया विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करण्याचे काय? याबद्दलही चर्चा झाल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.
तृणमूललाही सोबत घेण्याचे प्रयत्न
राहुल गांधी लवकरच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कळते. शरद पवार यांनीही
२८ मार्च रोजी विरोधी नेत्यांची बैठक बोलावली असून, तेथे ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भोजनास आपले प्रतिनिधी पाठवले होते. तेलगू देसम व तेलंगणा राष्ट्र समिती यांनाही संयुक्त आघाडीत आणण्याचे प्रयत्न पवार करणार असल्याचे समजते. या बैठकीच्या एक दिवसापूर्वीच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनास बोलावले होते. यात १९ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
>काँग्रेसचे आजपासून दिल्लीत अधिवेशन
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या अधिवेशनाला शुक्रवारी दिल्ल्लीमध्ये सुरुवात होत आहे. प्रत्यक्ष खुले अधिवेशन १७ मार्च रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार असून, उद्या कार्य समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा तयार होणार आहे. या अधिवेशनात काँग्रेसचे तरुण नेतृत्व व कार्यकर्ते यांच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल.
>कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी
या अधिवेशनात चार महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यावर प्रमुख नेत्यांसह ब्लॉक व जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे. यात बदल करावेत, अशी सूचना केली व ती पक्षाला योग्य वाटली तर तशी कृती लगेच केली जाईल. मोदी सरकारने चार वर्षांत केलेल्या कामगिरीची चिकित्सा करणारी पाच इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.