राहुल, प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये जाण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:13 AM2019-12-25T06:13:01+5:302019-12-25T06:13:19+5:30
राज्य सरकारने परत पाठविले; काँग्रेसकडून निषेध
मेरठ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांमध्ये ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये येण्यास उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी मज्जाव केला व त्यांना परत पाठविण्यात आले. काँग्रेस सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी, प्रियांका गांधी व अन्य काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांना पोलिसांनी पारतापूर पोलीस ठाण्यानजिक अडवले. आम्हाला मेरठमध्ये येऊ न देण्याच्या आदेशाची प्रत दाखवा, अशी मागणी करूनही पोलिसांनी प्रत न दाखवता आम्हाला परत पाठवले असे राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकाराबाबत उत्तर प्रदेश सरकारवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.
मेरठमध्ये संचारबंदी आहे.
राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या मेरठ भेटीमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पोलिसांनी या नेत्यांना सांगितले. त्यावर ते नेते स्वत:हून माघारी परतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिजनौरमध्ये आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी रविवारी भेट घेतली. उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान आतापर्यंत १७ जण मरण पावले आहेत.
सोनिया गांधी, ओवेसींविरोधात तक्रार
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भडक वक्तव्ये केल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पत्रकार रवीशकुमार यांच्या विरोधात अॅड. प्रदीप गुप्ता यांनी उत्तर प्रदेशमधील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.