नवी दिल्ली - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेराहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जबाबदारीचे वाटप केले आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रियंका गांधी उत्तर भारतामध्ये पक्षाचं नेतृत्व करणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही उत्तर प्रदेशात पोहोचणार आहे. येथे ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत प्रियंका गाधीही सहभागी होणार आहेत.
प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान जोरदार प्रचार केला होता. तसेच त्याचा पक्षाला फायदा झाला होता. हिमाचलमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या विजयानंतर पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राहुल गांधी दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच ते केरळमधील वायनाड येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर प्रियंका गांधी ह्या उत्तर भारतामध्ये पक्षाचं नेतृत्व करतील. त्या गांधी कुटुंबीयांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. याचा अर्थ हा नाही की, ते उत्तर भारतामध्ये प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी हे उत्तर भारतातही प्रचार करणार आहेत. मात्र येथील प्रचाराची धुरा ही प्रियंका गांधी यांच्याकडेच असेल. पक्षातील नेत्यांच्या दाव्यानुसार पक्ष यावेळी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित करणार आहे.
प्रियंका गांधी यांच्या पीआर टीममधील सदस्यांच्या दाव्यानुसार राहुल गांधी आता दक्षिण भारतामध्ये आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशसह पूर्ण उत्तरेतील नेतृत्वा सांभाळणार आहेत. प्रियंका गांधी लखनौ आणि दिल्लीमधून राहताना भारतीय जनता पक्षाची रणनीती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारसा फायदा झाला नव्हता. मात्र प्रियंका गांधी यांनी पक्षाला यश मिळून देण्यासाठी खूप मेहनत केली होती.