नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीच्या वाढलेल्या संपत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चूप का आहेत, असा सवाल करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्याच भाषेत उपरोधिक टोला लगावला आहे.‘द वायर’या वेब पोर्टलने जय शहा यांच्या संपत्तीत कितीतरी पटींनी वाढ झाल्याचे वृत्त दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शहा यांनी अहमदाबादच्या न्यायालयात या पोर्टलविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला असून त्यावर न्यायालयाने सुनावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्याकडे लक्ष वेधत राहुल गांधी यांनी ‘मित्रों शाह-जादा के बारेमें ना बोलूंगा ना बोलने दूंगा’ असे ट्टिट केले आहे. सोबतच त्यांनी न्यायालयाने आणलेल्या स्थगितीचे वृत्तही जोडले आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल कितीतरी पटींनी वाढल्याचा दावा द वायरने एका लेखात केला होता. अहमदाबादच्या न्यायालयाने गेल्या सोमवारी या पोर्टलवर शहा यांच्या कंपनीबाबत कोणतेही वृत्त प्रसिद्ध करण्याबाबत प्रतिबंध आणला आहे.अमित शहा यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे तसेच जय शहा यांच्या व्यवसायाबाबत तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेला दोन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करावा, अशी मागणी करीत काँग्रेसने हल्लाबोल चालविला आहे.अहमदाबादच्या (ग्रामीण) दिवाणी न्यायालयाच्या अतिरिक्त वरिष्ठ न्यायाधीशांनी द वायरला या प्रकरणाची अंतिम सुनावणी होईपर्यंत शहा यांच्या कंपनीबाबत कोणत्याही प्रकारचे वृत्त (मुद्रित, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, ब्रॉडकास्ट, टेलिकास्ट) प्रसिद्ध करण्यासह अन्य मीडियामध्ये कोणत्याही भाषेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मुलाखती, चर्चा, टीव्हीवर परिसंवाद घडवून आणण्यावर निर्बंध आणले. राहुल गांधी यांनी यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित करताना मानहानीच्या खटल्यात जय शहा यांना भाजप आणि केंद्र सरकार कायदेशीर मदत मिळवून देत असल्याचा आरोप केला आहे. तीन दिवसांपूर्वी एका टिष्ट्वटमध्ये ते म्हणाले की, ‘शाह-जादा को सत्ता का कानुनी सहारा, झंडा उंचा रहे हमारा’. विशेष म्हणजे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मानहानीच्या खटल्यात जय शहा यांची बाजू मांडणार आहेत.
जय शहा यांच्या कंपनीबद्दल मोदी चूप का?, राहुल गांधींचा टोला, ‘ना बोलूंगा ना बोलने दूंगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:58 AM