जयपूर-
देश तीन-चार बड्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं राहुल गांधी यांचं हे विधान आपण अनेकदा ऐकलं आहे. जयपूरमध्ये आयोजित महागाई विरोधातील रॅलीत देखील राहुल गांधी यांनी न चुकता हे वाक्य घेतलं होतं आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. जयपूरमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकार काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. "एअरपोर्ट, कोळसा खाण, सुपर मार्केट जिथं पाहावं तिथं नुसतं केवळ दोनच लोक दिसत आहेत. अदानीजी आणि अंबानीजी", असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानावरुन आता राजस्थानात राजकारणाला सुरुवात झाली आहे.
राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.
राजस्थानात १५०० मेगावॅट उर्जा निर्मितीसाठीचं सोलर पार्क बनवण्यासाठी अदानी आणि राजस्थान सरकारच्या संयुक्त विद्यमानं स्थापन करण्यात आलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याअंतर्गत जसलमैरच्या भीमसर, माधोपुरा, सदरासर गावात १३२४.१४ हेक्टर, बाटयाडू आणि नेडाण गावात २७६.८६ हेक्टर सरकारी जमीन अदानी ग्रूपला देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय ३० मेगावॅट विंड सोलर हायब्रिड पावर प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपला जसलमैरच्या केरालियाँ गावात ६४.३८ हेक्टर सरकारी जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अदानी ग्रूपला देण्यात आलेल्या जमीनीवरुनच आता राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोशल मीडियातही सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच राहुल गांधी यांची अदानी, अंबानींविरोधातील विधानं पण प्रत्यक्षात राजस्थान सरकारनं केलेला करार याचं उदाहरण देऊन अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच अदानी ग्रूपला जमीनीचं वाटप केल्याचा दावा सरकारनं केला आहे.