उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार आणि फसवून धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने आरोप केला की, या तरुणाने प्रथम तिच्याबरोबर इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. नंतर भेटीगाठी झाल्यावर बेशुद्ध करून बलात्कार केला. या कृतीला विरोध केल्यानंतर विवाहाचं आमिष दाखवलं. मात्र आता लग्नानंतर तो तिच्या मुलीचा धर्म बदलण्यासाठी दबाव आणत आहे. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबईमधील एका विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली होती. त्यानंतर तित्यावर बलात्कार केला. तसेच तिच्यासोबत निकाह केल्यानंतर उत्तर प्रदेशातील हापूड येथे पळून आला. त्यानंतर त्याचा पाठलाग करत सदर महिलाही हापूड येथे पोहोचली. तिने एफआयआर नोंदवली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
महिलेने बाबूगड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले की, माझ्या पतीचा २०१५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर माझी इन्स्टाग्रामवर राहुल नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री झाली. यादरम्यान, राहुल याचं तिच्या घरी येणं जाणं सुरू झालं. ८ मार्च २०२२ रोजी राहुल याने औषध देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेलं. तसेच कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला. तसेच त्याचा अश्लील व्हिडीओसुद्धा तयार केला. शुद्धीवर आले तेव्हा त्याने हा व्हिडीओ दाखवून माझं शोषण करण्यास सुरुवात केली.
राहुलने हा व्हिडीओ दाखवून माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. मी जेव्हा हा व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. तेव्हा त्याने लग्न करण्याचं आश्वासन दिलं. विवाहाच्या आश्वासनामुळे मी निश्चिंत झाले. त्यानंतर २५ मार्च रोजी राहुल माझ्या घरी आला. तसेच मला एका धार्मिक स्थळावर घेऊन गेला. तिथे त्याचे सहकारी आधीपासूनच उपस्थित होते.
तिथे गेल्यावर राहुलची खरी ओळख माझ्यासमोर आली. तो राहु नव्हता तर त्याचं नाव वसीम मलिक असल्याचं समोर आलं. त्यांनी दरडावून धमकावून मला निकाह करण्यास भाग पाडलं. त्यानंतर तो नोएडामधील बरौला येथे माझ्यासह राहू लागला. मात्र तो माझ्या ८ वर्षांच्या मुलीवरही धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणू लागला. दरम्यान, वसीम हा लव्ह जिहाद चालवत असल्याचा आरोपही पीडितेने केला. तसेच त्याने तिच्याकडून ३० लाख रुपये उकळल्याचेही सांगितले. पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वसिमला अटक केली आहे.