राहुल ५ डिसेंबरला होणार काँग्रेस अध्यक्ष, बिनविरोध निवड होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:24 AM2017-11-21T06:24:01+5:302017-11-21T06:24:35+5:30
काँग्रेसच्या कार्यसमितीने पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देत राहुल गांधी हे ५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील, असे जणू सोमवारी स्पष्टच केले
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दीर्घ काळापासूनच्या चर्चा व अंदाज यांना पूर्णविराम देत काँग्रेसच्या कार्यसमितीने पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देत राहुल गांधी हे ५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील, असे जणू सोमवारी स्पष्टच केले. निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला.
त्यानुसार १ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल व ४ रोजी अर्ज दाखल करता येईल. अर्जांची यादी ५ रोजी ३.३० वाजता जारी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ११ डिसेंबर असून, गरज भासल्यास १६ डिसेंबर रोजी मतदान होईल. मतमोजणी १९ डिसेंबर रोजी होईल. प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याविरुद्ध अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात येईल, असे नेत्यांचे म्हणणे आहे.
गुजरात निवडणुकांच्या नावाखाली संसदेचे अधिवेशन बोलाविण्यापासून पळ काढत आहे, अशी टीका सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी बैठकीत केली. गुलाम नबी आझाद, ए. के. अँथनी, जनार्दन द्विवेदी, अशोक गहलोत, अंबिका सोनी, पी. चिदंबरम व अन्य ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. ज्येष्ठ नेते एम. एल. फोतेदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
>सरकार खोटी माहिती देते - सोनिया गांधी
मोदी सरकार इतिहास बदलत आहे, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या की, पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीला शालेय अभ्यासक्रमातून हटवून पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार खोटी माहिती पसरवून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना बदनाम करीत आहे.सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यसमितीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे त्वरित अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायला हवी, असे सर्व नेत्यांनी एकसुरात सांगितले. मात्र, सोनिया गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. कुणी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करू नये, असे स्पष्ट केले.