नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्याने सध्या या परिसरात कमालीची तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे देशात लडाखमधील परिस्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान आता केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधीचे हे विधान बेजबाबदारपणाचे असून, ज्याचा लष्कराच्या क्षमतेवर विश्वास नाही, अशीच व्यक्ती असे विधान करू शकतो, असा टोला लगावला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. संरक्षणमंत्र्याची हात छाप टिप्पणी पूर्ण झाली असेल तर त्यांनी सांगावे की चीनने लडाखमधील भारतीय भूमीवर कब्जा केला आहे का?
दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावर किरेन रिजिजू यांनी जोरदार पलटवार केला आहे. "जेव्हा राजकीय फायदा हा राष्ट्रहितापेक्षा मोठा वाटू लागतो, तसेच कुणी व्यक्ती स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातात. अपेक्षा करतो की कुणीतरी १९६२ मध्ये केलेल्या चुकांचे आत्मचिंतन करेल,'' अशी बोचरी टीका रिजिजू यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्याअमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप