नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदीबाबत संरक्षण विभागाचे शिष्टमंडळ फ्रान्सच्या कंपनीशी चर्चा करीत असताना पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चा सुरू केली होती, हे आता कागदपत्रांतूनच सिद्ध झाले असून, त्या घोटाळ्यात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतले असल्याचेही उघड झाले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. चौकीदारही चोर है, या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला.राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भात भारत व फ्रान्समध्ये बोलणी सुरू असताना, पंतप्रधान कार्यालयाने समांतर बोलणी सुरू ठेवल्याने संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. तशी कागदपत्रे उजेडात आली आहेत. त्यांचा हवाला देऊन राहुल गांधी म्हणाले की, या व्यवहारात पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाचे ३० हजार कोटी रुपये आपला मित्र अनिल अंबानींच्या खिशात घातले.राहुल यांनी कागदपत्रांतील मजकूर वाचून दाखवून सांगितले की, राफेल चर्चेमध्ये पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्यामुळे भारताचे प्रतिनिधी मंडळ व संरक्षण मंत्रालयाची बाजू लंगडी पडली. याबद्दल संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे नाराजी व्यक्त केली होती. तसे आता लेखी स्वरूपात असल्याचे समोर आहे आहे. त्यामुळे या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हायलाच हवी.या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, विरोधकांना मोदी सरकारवर टीका करण्यासाठी नवे अस्त्रच सापडले आहे. या आरोपांचे जोरदार पडसाद लोकसभेत उमटले आणि विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत येऊन मोदी सरकारविरोधात घोषणा सुरू केल्या. त्यामुळे गोंधळात कामकाज तहकूब करावे लागले. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकार राष्ट्रद्रोही आहे. काही जण चोरीत सहभागी होऊनही आरोप मात्र आमच्यावर करीत आहे.यांचीही चौकशी करा, पण...राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले की, पी. चिदम्बरम, रॉबर्ट वाड्रा अशा कोणाचीही मोदी सरकारने अवश्य चौकशी करावी, पण त्याचबरोबर राफेल घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांचीही पंतप्रधान मोदींनी उत्तरे द्यायलाच हवीत.संरक्षणमंत्र्यांनी फेटाळले आरोपआरोप फेटाळताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, विरोधी पक्ष काही स्वार्थी प्रवृत्तींच्या हातचे खेळणे बनले आहेत. त्यांना देशाच्या संरक्षणाशी काही देणे-घेणे नाही. अशी कागदपत्रे उघड करणे, ही बाब गंभीर आहे.माजी अधिकाऱ्यांकडूनही इन्कारराफेल व्यवहारात पंतप्रधान कार्यालयाने समांतर बोलणी केली नसल्याचादावा निवृत्त एअरमार्शल एसबीपी सिन्हा यांनी केला. फ्रान्सशी केलेल्या चर्चेत भारताच्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. राफेलच्या किमतींविषयी पीएमओनेचर्चा केली नव्हती, असे माजी संरक्षण सचिव जी. मोहनकुमार म्हणाले.
मोदींचा राफेल खरेदीतील सहभाग कागदपत्रांतूनही सिद्ध - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:48 AM