नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे निकटवर्ती मानले जाणारे माखनलाल फोतेदार यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या नेतृत्वास काँग्रेसमधूनच आव्हान दिले जाईल, असे फोतेदार यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माखनलाल फोतेदार अर्थात एम.एल. फोतेदार यांनी आपल्या ‘दी चिनार लिव्हज’ या पुस्तकात राहुल यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राहुल यांना आपल्या पित्यासारखे राजकारण करणे मान्य नाही आणि त्यांच्या स्वत:च्या काही ‘मर्यादा’ आहेत. राजीव गांधी यांना खुद्द इंदिरा गांधी यांनी राजकारणाची बाराखडी शिकवली होती; पण राहुल यांचा कुणीही राजकीय गुरू नाही. पित्याप्रमाणे त्यांना कुणीही तयार केलेले नाही. राहुल यांच्यात काही प्रमाणात ‘अडेलतट्टूपणा’ आहे, असे फोतेदार यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व अद्यापही देशातील जनतेने स्वीकारलेले नाही. तसेच सोनिया गांधी यांचा ‘सुवर्णकाळ’ कधीचाच मागे पडला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. तूर्तास काँग्रेसमध्ये नेतृत्व करणारेच कुणी नाही. पक्षाने शिकणे कधीचेच सोडून दिले आहे. विधानसभा निवडणुकींच्या आव्हानांशी निपटण्यात काँग्रेस उणी ठरली. शिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेत्यांची निवडही चुकली आहे, अशी परखड मतेही त्यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहेत. नेहरू- इंदिरा गांधींचा वारसा असलेला पक्ष इतक्या रसातळाला जात असलेला बघणे क्लेशदायक असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. येत्या काळात राहुल यांना अधिक काम करण्याची आणि वरिष्ठ पदावर पोहोचण्यासाठी अपार कष्ट करण्याची गरज आहे. त्यांना राजकारणाचे धडे देणारे काँग्रेसमध्ये कुणीही नाही. कारण सोनिया इंदिरा नाहीत. सोनियांप्रमाणेच त्यांना सल्ला देणारे लोकही अनेक मुद्यांबाबत अनभिज्ञ आहेत. सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वाला कधी आव्हान मिळते, हे काळच ठरवेल; पण हे आव्हान ते कसे पेलवतात, हे मला बघायचे आहे. कारण सोनिया इंदिरा नाहीत आणि राहुल गांधी संजय गांधी नाहीत, असेही त्यांनी लिहिले आहे.
राहुल यांच्या नेतृत्वाला काँग्रेसमधूनच आव्हान मिळेल
By admin | Published: October 25, 2015 11:10 PM