Lok Sabha Election Result 2024, Rahul Gandhi Wayanad and Rai Bareli: लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीबाबत भारतभरात चांगलाच उत्साह आहे. अनेक बडे नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी यांचे भवितव्य पणाला लागले आहे. एनडीए आणि इंडिया यांच्या लढतीत एनडीएने चांगली आघाडी घेतली आहे. पण इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी यांनी मात्र आपली प्रतिष्ठा सुरुवातीच्या कलांमध्ये टिकवून ठेवली आहे. राहुल गांधी हे दोनही मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.
काँग्रेसचे खासदार केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा जागांवरून निवडणूक लढवत आहेत. ते रायबरेलीमधून भाजपाचे दिनेश प्रताप सिंग यांच्याविरोधात तर वायनाडमध्ये भाजपचे के सुरेंद्रन आणि सीपीआय-एमच्या ॲनी राजा यांच्या विरोधात आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी ८० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर दिसून आले. तर उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी २८ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडी घेतली.
दरम्यान, रायबरेली लोकसभा मतदारसंघ ही उत्तर प्रदेशातील काँग्रेसची एकमेव जागा होती, जिथे २०१९ मध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. सोनिया गांधी सलग चौथ्यांदा विजयी होऊन येथून खासदार झाल्या होत्या. रायबरेली शिवाय उत्तर प्रदेशातील अन्य एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवणे शक्य झाले नव्हते. अमेठीची जागा मात्र राहुल गांधींना गमवावी लागली होती. त्यामुळे यंदा त्यांनी अमेठीच्या जागी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, वायनाड मतदारसंघात राहुल गांधींचे यश कायम असल्याचे दिसत आहे.