नवी दिल्ली/मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व सीबीआयनं एकत्र छापे घालून सुमारे २६ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली.नीरव मोदी भारतातून पळून गेला आहे. परत येण्याचे आदेशही त्याने अमान्य केल्याने त्याच्याविरुद्ध वॉरंटही काढण्यात आले आहे. आतापर्यंत नीरव मोदीची एकूण ७,६३८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.'समुद्र महाल' इमारतीतील मोदीच्या निवासस्थानी घालण्यात आलेल्या छाप्यामध्ये महागड्या वस्तू व दागिन्यांचा समावेश आहे. छाप्यात १0 कोटी रुपयांची एक अंगठी व १ कोटी ४0 लाख रुपयांचे घड्याळ ताब्यात घेण्यात आले आहे. याखेरीज १0 कोटींचे पेटिंग्जही जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी दिली. याआधीही भारतातील अनेक ठिकाणी व दुकानांवर छापे मारून कोट्यवधी रुपयांचे दागिने, हिरे व अन्य मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे.नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड या कंपनीने 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारत व जगभरात अनेक ज्वेलरी शोरुम्स सुरु केल्या. दिल्ली, मुंबई, लंडन, हाँगकाँग, न्यूयॉर्क आदी ठिकाणी मोदीची २५ लक्झरी स्टोअर्स आहेत. तेथील मोदी ब्रँडच्या ज्वेलरीची किंमत १0 लाखांपासून ५0 कोटी रुपयांपर्यंत आहे. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारीच होते.वडिलांचा व्यवसाय थंडावल्याने नीरव मोदी शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममधून भारतात आला होता. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्टही आहे. नीरव मोदी देशात बराच काळ 'डायमंड किंग' नावाने ओळखला जात असे. फोर्ब्जच्या या जगातील श्रीमंतांच्या यादीत मोदी ८४ व्या स्थानी होता. फोर्ब्जनुसार नीरव मोदीची संपत्ती सुमारे १२ हजार कोटी रुपयांची आहे.
नीरव मोदी याच्या निवासस्थानी छापा; महागडे घड्याळ, अंगठी आणि पेंटिंग्ज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:18 AM